भावा, आता खटक्यावर बोट !
बहुतेक सर्वच पक्ष आज सोशल मिडीयाचा अत्यंत कौशल्यानं वापर करत आहेत, कारण या सोशल मिडीयाला युवा पिढी कनेक्ट आहे आणि युवा पिढीच्या मताला आता खरी किंमत आहे. कोल्हापुर जिल्हयाचं राजकीय भवितव्य आता नवमतदारांच्या हातात आहे, हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. तब्बल 25 हजार 382 इतक्या नवमतदारांची नोंदणी झालीय, यात 39 तृतीयपंथी मतदार आहेत, तर 20 ते 39 वयोगटातल्या मतदारांची संख्या 11 लाख 95 हजार 584 इतकी आहे.
पुर्वी आपले विचार, भुमिका, अभ्यास, संस्कार यावर पक्ष किंवा विचारधारा निवडली जायची. सध्या मात्र राजकीय क्षेत्रात निव्वळ खिचडी झालीय. शिवसेनेचे दोन गट, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट, भाजपमध्ये नवे आणि जुने वाद तसंच कॉंग्रेसमध्येही गटातटाचं राजकारण आहे. त्यामुळं या सर्वच राजकीय मंडळींना या युवा मतदारांना आपल्याकडं खेचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे, हे नक्की. युवकांनीही आता प्रत्येकाची राजकीय पार्श्वभूमी, विचार आणि स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करूनच खटक्यावर बोटं ठेवायला हवं. ही सर्वात मोठी जबाबदारी आणि युवा मतदारांवर आहे.