…केवळ खाद्यसंस्कृती नव्हे, अनोखी जीवनशैली !
तांबडा-पांढरा म्हटलं कोल्हापुरच आठवतं. झणझणीत कटाचा लालभडक तांबडा रस्सा, कितीही पिला तरी समाधान न होणारा पांढरा रस्सा, टम्म फुगलेली भाकरी, खिमा आणि दिसताक्षणी एक तरी पीस तोंडात टाकण्याची अतीव इच्छा होणारं सुकं मटण क्षणात समोर उभं राहतं. ज्यांनी या स्वर्गीय मेजवानीची चव चाखलीय, ते जगाच्या पाठीवर कुठंही असोत, तोंडाला पाण्याची धारंच लागणार. या मेजवानीची चव तर अशी लाजवाब की अनेक फुड ब्लॉगर्सना शब्द आठवायचे बंद होतात. हा हू करत ते फक्त एक्सलंट, अशी बोटांनी खुण करतात. चवीसोबतच पौष्ठिकतेचा अतिशय काळजाला भिडणारा हा मिलाफ म्हणजे जेवणाच्या तृप्तीचा जागतिक मानबिंदू ठरावा, असाच आहे.
कोल्हापुरच्या ऐतिहासिक भूमीतली ही अनोखी खाद्यसंस्कृती केवळ मेजवानीपुरतीच मर्यादित नाही, तर कोल्हापूरकरांच्या दैनंदीन जीवनातही तीच्या पाऊलखुणा पदोपदी दिसत असतात. शहरात येणा-या पाहुण्यांना काही पत्ते हवे असतात, काही माहिती हवी असते, पण कोल्हापुरचं मोठं वैशिष्ठ हेच की त्यांना हव्या असणा-या माहितीपेक्षा अधिकच माहिती मिळते. काही उत्साही कार्यकर्ते तर माझ्या मागे या, असं म्हणत पाहुण्याला त्यांच्या नातेवाईकांच्या दारापर्यंत सोडूनही येतात. पांढ-या रश्श्यामध्ये जी पौष्ठिकता, सात्विकता आणि हवाहवीशी वाटणारी चव आहे, अगदी तसंच नातं अशा पाहुणेमंडळींच्या बाबतीत कोल्हापूरकर जपतात.
तांबडया रश्श्याचा झणझणीत अनुभव दिसतो तो आंदोलनांमध्ये. ओल्या मसाल्यासारखी विचारांची पक्की बैठक, तिखटाच्या परफेक्ट प्रमाणासारखी ठोस भुमिका घेवून आंदोलन सुरू झालं की या आंदोलनातल्या घोषणांना जणु तांबडया रश्श्यावर असणा-या कटाचा झटका जाणवतो. ज्याच्या विरोधात आंदोलन आहे, त्याला ठसका लागलाच पाहिजे.
इथल्या सामाजिक कार्याला पांढ-या रश्श्याच्या चवीसारखीच विचारांची सात्विक बैठक आहे. राजकारणाला तर खिलाडुवृत्तीची एक वेगळीच झालर आहे. निवडणुकीच्या काळात तर तांबडया-पांढ-याच्या मेजवानीनं कार्यकर्त्यांचा होणारा श्रमपरिहार म्हणजे जणु उद्याच्या प्रचारासाठी नवी उर्जा देणाराच असतो.
अनेकविध घटनांची अशी मालिका आपल्याला सांगता येईल, ज्यातुन कोल्हापूरचा इतिहास, संस्कृती, खाद्यपरंपरा सतत आपल्या मनावर कोरत जातात. याची माहिती घेण्याची जिज्ञासा तांबडा पांढ-याच्या पुढील मेजवानीची आतुरता असल्यासारखीच असावी. माध्यमांचं स्वरूप, जीवनशैलीतले बदल आज सर्वांचं लक्ष वेधत आहेत. चर्चेचे विषय बनत आहेत. या प्रवाहातुन जात असतानाच कोल्हापुरच्या या अनोख्या खाद्यपरंपरेला, जीवनशैलीला नव्या पिढीच्या दृश्टीकोनातुन मांडण्याचा हा प्रयत्न नक्कीच कोल्हापुरची शान आणि मान आणखी उंचावणाराच असेल