विषय हार्ड…2 वर्षात 644 जण ‘ढिचक्याव’!
विषयाला हात घालायचा म्हटलं तरी अंगावर काटा येतो राव ! विषयच हार्ड. खुन, मारामारी, दहशत, चोरी, दरोडा यांच्या बातम्यांशिवाय आता दैनिकांचं पानच भरत नाय. कारणं तर काय, राजकीय खुन्नस, आर्थिक देवाण घेवाण, अनैतिक संबंध आणि तु मोठा का मी…रोज अशा बातम्या सवयीच्या असल्या तरी गेल्या दोन वर्षातली आकडेवारी पाहिली तर खरंच परस्थिती किती हाताबाहेर आहे, याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. कोल्हापूर परिक्षेत्रात गेल्या दोन वर्षात विविध कारणांनी तब्बल 644 मुडदे पाडण्यात आलेत. इतकेच नव्हे तर 550 पिस्तुलं पोलिसांनी जप्त केलीत.
कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण असे विभाग आहेत. दैनिक पुढारीच्या वृत्तानुसार, जिल्हानिहाय 2022 व 2023 मध्ये अनुक्रमे खुन झालेली संख्या अशी, कोल्हापुर 50 आणि 52, सातारा 40 आणि 45, सांगली 56 आणि 69, सोलापूर ग्रामीण 57 आणि 64 तसंच पुणे ग्रामीण 109 आणि 102. जप्त करण्यात आलेल्या घातक शस्त्रांमध्ये कोल्हापूर जिल्हयात 72 आणि 36, सांगली 69 आणि 62, सातारा 39 आणि 54, सोलापुर ग्रामीण 28 आणि 21 तसंच पुणे ग्रामीणमध्ये 53 आणि 116.
या आकडेवारीवरून एक बाब स्पष्टपणे समोर येते ती म्हणजे, कोल्हापुर परिक्षेत्रात अन्य जिल्हयांच्या तुलनेत पुणे ग्रामीणमध्ये गुन्हयांची आकडेवारी दुप्पट आहे. काही सराईत गुंड आणि संघटीत गुंड टोळया यांच्यावर कारवाईची अत्यंत चांगली मोहिम सध्या पुण्यात सुरू आहे. त्याला अधिक गती देण्याची गरज तर आहेच, मात्र ही दहशत हाताबाहेर जावु नये, यासाठी पोलिसांनी वेळीच कोल्हापूर परिक्षेत्रातही अशी मोहिम राबवण्याची आवश्यकता आहे.
शस्त्रांची आकडेवारी पाहता या पिस्तुलांचे या परिसरात येण्याचं रॅकेट शोधण्याचं मोठं आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे. पुण्यात असे प्रकार होतातच, परंतु कोल्हापूरातही नंग्या तलवारींची दहशत आहे. कधी कधी तर पिस्तुल हातात घेवून खुलेआम फिरणारेही आढळतात. त्यामुळं जशी कोल्हापूरात मोहिम सुरू आहे, तशीच मोहिम कोल्हापुरात राबवण्याची गरज आहे. मध्यंतरीच्या काळात फाळकुट दादांवर कारवाईची मोहिम अत्यंत चांगल्या प्रकारे राबवण्यात आली. याही कारवाईत सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे.